बाबांच्या आईला आम्ही मोठीआई म्हणत असू. गव्हाळ वर्णाची ठेंगणी-ठुसकी मोठीआई नऊवारी लुगडे नेसत असे. कानात मोत्याच्या कुड्या, गळ्यात सोन्याची साखळी, हातात सोन्याच्या पाटलीवजा बांगड्या, अशी तिची राहणी त्या काळानुसारच होती. लक्षात राहण्यासारखे काही वेगळे होते तर तिचे लांबसडक केस. ती आपल्या केसांची खूप काळजी घेत असे. तेल लावून रोज मोठ्ठा जाडजूड आणि गोल आंबाडा घालत असे. तिच्या केसांना चुकून आमचा हात लागला तर ते तिला खपत नसे.
आमची आजी म्हणून तिची ओळख श्रीमती लक्ष्मीबाई जोशी अशी असली तरी तिचे माहेरचे नांव तारा करजगीर होते. तिचा जन्म अंदाजे १९०५-१९१०च्या दरम्यान झाला असावा. राजस्थान मधील निंबाहेडा हे तिचे माहेर होते. पण ती आणि तिच्या माहेरचे लोक त्याला "लिंभाडा " म्हणत असत. तिच्याबरोबर लहानपणी "लिंभाड्याला" गेल्याचे मला आठवते. पण ती आठवण पुसटच आहे. तीन बहिणी आणि दोन भाऊ अश्या भावंडांपैकी मोठीआई मधली बहीण होती. तिची मोठी बहीण इंदूरलाच असे, आणि धाकटी इंदूरच्या जवळ धारला. तिच्या भावाच्या मुलांपैकी खूपजण इंदूरला होते, आणि ते सगळे त्यांच्या "जिजीआत्या" ला भेटायला वरचेवर आमच्या घरी येत असत.
मी आणि माझी बहीण लहानपणीपासून नेहमीच मोठीआई जवळ झोपायचो. झोपता-झोपता तिच्याकडून ऐकलेल्या रामायण-महाभारतातील गोष्टी अजूनही आठवणीत आहे. ती शाळेत गेली नाही, पण तिला लिहिता-वाचता येत होते. ती पत्रव्यवहार करायची, वर्तमानपत्र वाचायची, हिशेब लिहायची, पोथ्या वाचायची, वहीत भजने आणि पदे लिहायची. दासबोध, हरिविजय तिच्या संग्रही होते. हरिविजय तर बाइंडिंग नसलेली पोथी होती. तिची सुटी पानें कापडी आवरणात व्यवस्थित ठेवलेली असायची.
आमच्या मालकीचे एक घर इंदूरच्या जवळ बडवाहला होते. तिथे काही कुटुंब भाड्याने रहात असत. आम्ही इंदूरला होतो. भाडेकऱ्यांसाठी सगळी दृष्टीआड सृष्टीच होती. खूप लोक भाडे बुडवून निघून जायचे आणि आम्हाला पत्ताही लागायचा नाही. कधीमधी भाड्याची मनी ऑर्डर यायची. पोस्टकार्डवर कुणाकुणाची पत्रें देखील यायची. तो सगळा व्यवहार मोठीआईच बघायची. मी तिच्या बरोबर एक-दोनवेळा बडवाहला गेल्याचे आठवते. नागेश्वरपट्टीतल्या त्या घराचीही अंधुकशी आठवण आहे.
माझ्या लहानपणीच माझ्या आजोबांचे निधन झाले त्यामुळे मोठीआई आणि आजोबांना बरोबर पाहिलेले मला आठवत नाही. मोठीआई आजोबांची दुसरी पत्नी होती. आजोबा महाराणी इंदिराबाई होळकरांकडे खाजगीत मोठ्या हुद्द्यावर होते. ते महाराणी साहेबांबरोबर युरोपला जाऊन आले होते. आजोबा चांगलेच उंच होते. दोघांच्या उंचीत आणि वयात बऱ्यापैकी अंतर होते.
मोठीआई श्रीमती भागीरथीबाई वैद्य नांवाच्या आध्यात्मिक गुरूंची शिष्या होती. त्यांचे सर्व शिष्य त्यांना गुरुमहाराज आणि त्यांच्या जागेला बंगला म्हणायचे. बंगल्यावर दर रविवारी कीर्तन असायचे. कीर्तनाला तिथे कथा म्हणत असत. सर्व शिष्य आळीपाळीने कथा करत. मोठीआई देखील कथा करायची. गुरूपौर्णिमेला मोठा उत्सव असायचा. बंगल्यावरचा कुठलाही कार्यक्रम मोठीआई कधी चुकवत नसे. तिचे गुरुबंधू आणि गुरुभगिनी तिला जोशीवहिनी म्हणून संबोधत. लहानपणी आम्हीपण बरेच वेळा मोठीआई सोबत बंगल्यावर कथेला जायचो. शिवाय गुरुपौर्णिमेला तिथे शेकडो शिष्य आपापल्या कुटुंबासकट जेवायला जायचे. श्लोकांच्या गजरात पत्रावळींवरच्या जेवणाच्या पंगती उठत.
आमच्या घरी गुरु महाराजांची मोठी तसबीर भिंतीवर लागलेली होती. शाळेत जातांना त्या तसबिरीला नमस्कार करून जायचे असे मोठीआईने सांगितले होते आणि ते आमच्या अंगवळणी पडले होते. आमच्याकडच्या चमेलीच्या वेलीला त्यावेळी खूप फुले येत असत. मोठीआई अर्धोन्मिलित कळ्यांचा हार करून त्या तसबिरीला घालत असे. त्या उमलल्या की त्यांचा घमघमाट घरात पसरे. मोठीआई सकाळी उठून देवघरात बसून काही पदे गुणगुणायची. त्यातील "वाकुनी टाक सडा राधिके वाकुनी टाक सडा", "चित्ती तुमचे पाय डोळा रूपाचे ध्यान" आणि "लिजो रे कन्हैया बिडी पानन की लिजो लिजो रे" अजूनही माझ्या आठवणीत आहेत.
मोठीआई बरेच सोवळेओवळे पाळायची. सगळे कुळधर्म कुळाचार व्यवस्थितरित्या पाळले गेले पाहिजेत ह्याकडे तिचा कटाक्ष असायचा. मोठीआई आणि आई दोघी मिळून दरवर्षी सगळे सणवार आणि कुळाचार साग्रसंगीतरित्या करायच्या. बरेच उपाससुद्धा असायचे. आम्ही लहान होतो त्यामुळे आम्ही रोजच्यासारखे जेवायचो पण मोठीआई तिच्या फराळातल्या थालीपिठाचा तुकडा किंवा साबुदाणा खिचडीचा घास न चुकता आम्हाला द्यायची आणि ते फार चविष्ट असायचे. कधी-कधी जेवतांना पोळ्या कमी पडायच्या. मग मोठीआई भरपूर तूप घालून जाड्या कणिकेचा पानगा करायची. तो इतका छान लागायचा की चार घास जास्तच खाल्ले जायचे. तिच्या हातच्या घडीच्या पोळ्या किंवा बाट्या अप्रतिम असायच्या.
गाडीवर विकायला येणाऱ्या फळांपैकी मोठीआई जवळ-जवळ रोज काहीतरी विकत घ्यायची. आणि त्याचे तीन भाग करून आम्हा तिघांसाठी काढून ठेवायची. घरी यायला कुणाला उशीर झाला तर स्वयंपाकघराच्या दारात उंबऱ्यावर पाणी पिण्याचे भांडे पालथे घालायची. कुठल्याही वस्तूला विशेषतः पुस्तकाला किंवा कागदाला चुकून पाय लागला तर नमस्कार करायला सांगायची. त्याची इतकी सवय झाली की तो आता आपोआपच केला जातो. पितृपक्षात नवे कपडे विकत घ्यायचे नाहीत, चातुर्मासात कांदे खायचे नाहीत असे तिचे नियम होते. दरवर्षी पितृपक्ष संपल्याबरोबर आम्ही दिवाळीसाठी नव्या कपड्यांची खरेदी करायचो.
मोठीआई आपल्या जुन्या झालेल्या लुगड्यांना मशीनवर शिवून त्यांच्या चौघड्या तयार करायची. त्या खूप ऊबदार आणि मऊ असायच्या. मी कितीतरी वर्षें त्या चौघड्याच पांघरून झोपत असे. कुठल्याही चादरीला चौघडीची सर येत नाही. १२ सप्टेंबर १९९५ला वृद्धापकाळाने मोठीआईला देवाज्ञा झाली. तिच्या चौघड्यांप्रमाणे तिच्या आठवणींची ऊब इतक्या वर्षांनंतर अजूनही मनात आहे.